जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरत आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाने आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला अडचणी आणण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात १ हजार उमेदवार अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात १ हजार उमेदवार मराठा समाजातर्फे उभे राहणार आहे. या मतदार संघात अडचणी निर्माण करण्याची कुटनीती मराठा समाजाने तयार केली आहे. हजारापेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएमवर मतदान घेता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा व महाराष्ट्रातून वाराणसीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे मराठा आरक्षणाचे आंदोलक विनायक पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी वाराणसीत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करुन करणार आत्मक्लेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आपल्या घरावर मी मतदार मी उमेदवारी असे पोस्टर लावण्याचे आवाहन केले आहे. ही घोषणा नांदेडच्या सभेत त्यांनी केली आहे. मराठवाड्यातील हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट कुणबी मराठा आरक्षण देण्याची मागणी विनायक पाटील यांनी केली आहे.