नवी दिल्ली वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास मंजूरी दिली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय दिला. मराठा आरक्षणावर १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती. या निर्णयाने मराठा समाजाला शिक्षणात १३ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ टक्के आरक्षण देण्यात आले होते.
मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) टक्केवारीत सुधारणा करणारे विधेयक नुकतेच पावसाळी अधिवेशनात १ जुलै रोजी मंजूर केले गेले होते. त्यानंतर विधेयकाला राज्यपालांनी मान्यता दिली व विधेयक अंमलबजावणीसाठी हा आदेश जारी करण्यात आला. या आदेशाने सुधारित मराठा आरक्षणाची अंमलबजावणी 1 जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने सुरू झाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात सरसकट 16 टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाने 27 जूनला निकाल देताना मराठा आरक्षणाला मान्यता देताना, राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात आरक्षण देण्यात आल्याचे नमूद करून आरक्षणात कपात करण्याचे आदेश दिले होते. शिक्षणात 12 टक्के, तर नोकर्यांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यास न्यायालयाने मान्यता दिली. त्यानुसार राज्य सरकारने 1 जुलै रोजी सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडले. या विधेयकाला एकमताने मान्यता देण्यात आली होती.