Home Cities धरणगाव धरणगावात मराठे परिवारासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

धरणगावात मराठे परिवारासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
120

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील शिवसेनेची ताकद वाढवणारी महत्त्वपूर्ण घडामोड आज पाहायला मिळाली. मराठा टेन्टचे संचालक जगदीश भाऊ दयाराम मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यामुळे आगामी राजकीय समीकरणांवर धरणगावात महत्त्वाचा परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय जाहीर करताच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे शिवबंधन बांधून अधिकृत स्वागत केले. पक्षप्रवेश सोहळ्यात भैया मराठे, रवींद्र मराठे, अनिल मराठे, विकास मराठे, राहुल मराठे, परमेश्वर महाजन, तुळशीराम मराठे, पवन महाजन, विकास महाजन, साई महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या कार्यकर्त्यांनी गेल्या काही काळात धरणगाव शहरातील सामाजिक काम, युवकांच्या प्रश्नांवर पाठपुरावा आणि स्थानिक विकासातील सहभागामुळे ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे पक्षाला धरणगावात नवसंजीवनी मिळेल, असा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

प्रवेश सोहळ्याच्या वेळी शिवसेना जळगाव जिल्ह्याचे प्रमुख नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा शिवसेना प्रवक्ते पी. एम. पाटील, उपजिल्हा प्रमुख अँड. शरद माळी, युवा नेते प्रतापराव पाटील, माजी सभापती अनिलभाऊ पाटील, शहर प्रमुख धीरेंद्र आप्पा, विलासभाऊ महाजन यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगावच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगत नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांनुसार सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले. स्थानिक पातळीवर युवा कार्यकर्त्यांचा वाढता सहभाग ही राजकारणातील सकारात्मक बदलाची नांदी असल्याचे त्यांनी नमूद केले.

धरणगावातील या मोठ्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद निश्चितच वाढणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड लक्षणीय मानली जात आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षाला तळागाळात अधिक मजबुती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound