जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली असून यामुळे वैद्यकीय पथक उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाले आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे-पाटील हे सामाजिक कार्यकर्ते मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी पहिल्यापासून अन्नाचा तर नंतर पाण्याचा देखील त्याग केला आहे. राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्याचे केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यांनी सरकारला आता जीआर काढण्यासाठी चार दिवसांची मुदत दिलेली आहे.
दरम्यान, रात्रीपासून मनोज जरांचे यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे प्रशासनाने रात्रीपासूनच काळजी घेण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा पोलीस अधिकार्यांनी त्यांची तपासणी केली आहे. तर आता सकाळी वैद्यकीय पथक हे उपोषणाच्या ठिकारी दाखल झाले आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप खालावले असल्यामुळे त्यांना पथकाने सलाईन लावली आहे. तर, दुसरीकडे आज देखील मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू ठेवले आहेत. आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार असून यात मराठा आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.