आंतरवली सराटी-वृत्तसेवा | राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र विधेयकाची तयारी केली असतांना मराठा महायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आपण आधीच्या मागण्यांवर ठाम असून त्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आजपासून दोन दिवस राज्य विधीमंडळाचे स्वतंत्र विधेयक संमत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रीमंडळाची आज सकाळी बैठक झाली असून यात मराठा समाजाच्या आरक्षणाला मंजुरी देण्यात आली. याबाबतची विस्तृत माहिती समोर आली नसली तरी सरकार मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यास तयार असून यासाठी स्वतंत्र विधेयक मांडण्यात येऊन ते मंजूर करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, याची माहिती समोर येताच आज आंतरवली सराटी या आपल्या गावात मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. आणि समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी आढळून आल्यामुळे सरकारला आरक्षण द्यावेच लागणार आहे. तर, सगेसोयर्यांना आरक्षण मिळावे या मागण्यांवर आपण ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर उद्याच आम्ही आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहोत. यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती देखील याप्रसंगी मनोज जरांगे यांनी दिली. मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात आला असून आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तर, भुजबळांचे ऐकून मराठ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी याप्रसंगी केला.