आम्ही तुमच्याही धुर्‍या वर करू शकतो : जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा !

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून धडा शिकवण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून आगामी काही दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करत इशारा दिला आहे. यात त्यांनी प्रामुख्याने राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सूचक इशारा दिला आहे.

आज मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गिरीश महाजन साहेब, तुम्ही कितीही डाव टाका. मी सुद्धा आरक्षणातला बाप आहे आणि जातवान क्षत्रिय मराठा आहे. तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर तुम्ही उड्या काय मारायला लागले, तुमच्या डोक्यात हवा घुसली, मंत्रिपदाची मस्ती घुसली. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात नाही, जामनेरमध्ये एक लाख छत्तीस हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे. ते शेवटी मराठे आहेत. आम्ही तुमच्या सुद्धा धुर्‍या वर करु शकतो. असे वक्तव्य त्यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी आधी देखील गिरीश महाजन यांना आपण जामनेरातून पराभूत करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता त्यांनी थेट मराठा मतदारांच्या उल्लेखासह निर्वाणीचा इशारा दिल्याची बाब ही लक्षणीय मानली जात आहे. विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणूक ही अवघ्या तीन महिन्यांवर आली असतांना मनोज जरांगे यांनी गिरीश महाजनांना जामनेरातून पराभूत करण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content