रशिया वृत्तसंस्था । भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिला जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. रशियाची एकातेरिना पाल्टसेवा हिने ४८ किलो वजनी गटात मंजूला मात दिली. मंजूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
मंजू राणी हिने पहिल्यांदाच विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभाग घेतला होता. अंतिम फेरीतल्या या पराभवानंतरही मंजू राणीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. १८ वर्षांनंतर पदार्पणात जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी मंजू पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे. २००१ साली मेरी कोमने अशी कामगिरी करुन दाखवली होती. मंजूच्या पराभवानंतर भारताचं वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. मंजूने शनिवारी उपांत्य फेरीत ४८ किलो वजनी गटात माजी कांस्य पदक विजेता थायलंडची चुथामाथ काकसात हिचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मंजूव्यतिरिक्त तीन अन्य भारतीय महिला बॉक्सरना कांस्य पदकावर समाधान मागावे लागले. मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९) यांचा उपान्त्य फेरीत पराभव झाला. लंडन ऑलिम्पिकची कांस्य पदक विजेता मेरी कोम हिला तुर्कस्थानच्या बुसेनांज कारिकोग्ली हिच्याविरोधात हार पत्करावी लागली. मेरी याआधी सहा वेळा विश्व चॅम्पियन ठरली होती.