जळगाव प्रतिनिधी । सध्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे जिल्हा मनियार बिरादरीतर्फे सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारूक शेख यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने ९ एप्रिल रोजी शासन दरापेक्षा कमी दरात आयसीयू, ऑक्सिजन, बाय पेप व नॉन आयसीयू चे पंचवीस खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अर्थातच हॉस्पिटल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय जळगाव येथे सुरू केले होते. सध्या कोरोनाची रूग्णसंख्या उतरणीला लागली असल्यामुळे संबंधीत हॉस्पिटल १८ मे पासून बंद करण्यात आल्याची घोषणा बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रका द्वारे केली आहे.
या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात फारूक शेख यांनी महापौर जयश्री महाजन, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रावलानी. डॉ. विजय घोलप, डॉ. सुयोग चौधरी, डॉ. मंदार पंडित यांच्यासह शासकीय प्रमुख ऑडिटर कैलास सोनार, फायर ऑफिसर श्री बारी, डॉक्टर विकास पाटील मनपा व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आभार मानलेे आहेत.
दरम्यान, हॉस्पीटलच्या चाळीस दिवसाच्या रुग्णसेवेत सुमारे ९७ रूग्णांनी या सेवेचे लाभ घेतला असून यातील चार रूग्णांना प्राण गमवावे लागल्याने फारूक शेख यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. यामुळे जर कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला तर पुन्हा हे सेंटर कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली आहे.
तर, मनियार बिरादरीतर्फे फक्त १८०० रु एच आर सी टी व १३०० रूपयात पूर्ण कोविड रक्त तपासणी या दोन्ही सेवा चालू राहणार असून इतर वैद्यकीय सेवे सोबतच रेशन किट, स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, कोरोना रुग्णाचे दफन विधी, सुरूच राहतील व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन फारूक शेख यांनी केले आहे.