मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा घोषीत केला असून यात संपूर्ण कर्जमाफीसह अनेक लोकप्रिय बाबींचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत याला जाहीर करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या जाहीरनाम्यात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ असं आश्वासन देण्यात आलं आहे. याप्रसंगी दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, शेती आणि शेतकर्यांवर हलाखीची परिस्थिती निर्माण केली आहे. अर्थ व्यवस्थेचा मंदावलेला वेग, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ, देशावरील कर्जात दुपटीने वाढ, परराष्ट्र धोरण भरकटले आहे. महागाई, वाढत्या किंमती, नोटबंदीच्या निर्णयाने शेतकर्यांची दुर्दशा झाली आहे. १४ वर्षात बेरोजगारीने निच्चांक गाठला आहे. त्यामुळे देशातील शेतकरी प्रचंड नाऊमेद आणि निराश झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात शेतकर्यांना केंद्रस्थान देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
वळसे पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कृषीक्षेत्र विकासाकडे, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्यासाठी पुरेसे लक्ष देणार आहे. शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यात येईल शिवाय देशातील सर्व शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन पक्षाने जाहीरनाम्यात दिले आहे. यासोबत, आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर, कामगार कायद्यात सुधारणा, कर सुधारणा, मानव संसाधन विकास, आरोग्याचा हक्क, महिला व बाल कल्याण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरीक, परराष्ट्र धोरण, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट करताना, मनरेगा, जल आणि सिंचन विकास, उत्पन्नातील असमानता या विषयावर भर देण्यात येणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.