जळगाव /भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी आजपासून बाजारात लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत.
नागरिकांनी लोणचे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कैऱ्या खरेदी सुरु केली आहे. जळगावात या कैऱ्या बाजारात ७० ते ८० रुपय किलो भावाने सध्या विकल्या जात आहेत.
कैऱ्या कापण्यासाठी बळीराम पेठेत येथे मुश्ताक रहेमान शाह हे १० रुपये किलोप्रमाणे कैऱ्या कापून देत आहेत. त्यांचा ४० वर्षांपासून कैऱ्या कापण्याचा खानदानी धंदा आहे. लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या कापण्याचे काम मुश्ताक रहेमान शाह यांचे पूर्वज करत होते. आजपासून त्यांनी कैऱ्या कापण्याला सुरवात केली असून त्यांच्याकडे दिवसभरात ८० ते १०० किलो कैऱ्या कापल्या जात असतात.
भुसावळ येथे आज रविवारचा बाजार असल्याने बाजारात कैऱ्या खरेदी करताना महिलांची मोठी गर्दी झाली होती. मराठवाड्यातील कैऱ्यांना तसेच गावरान कैऱ्यांना येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साधारण३० ते ४० रुपये किलो दराने या कैऱ्यांची विक्री केली जात आहे. कैरी फोडून देणारे किलोमागे १० रुपये घेत आहेत. गेल्यावर्षी पाच रूपये किलो दराने कैरी फोडून दिली जात होती, यंदा त्यात भाववाढ झाली आहे. तरीदेखील महिला वर्गाचा कैरी खरेदी करण्याकडे मोठा प्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत आहे.