भुसावळ, प्रतिनिधी | जामनेर येथून परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चढलेल्या भुसावळ येथे येणाऱ्या एका महिलेचे चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना आज (दि.१) दुपारी उघडकीस आली. त्यानंतर सदर बस येथील तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात येवून सगळ्या प्रवाशांची झडती घेण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून भुसावळकडे येणाऱ्या महामंडळाच्या बसमध्ये स्नेहा वकटे (वय २१) राहणार पिंपरी-चिंचवड, पुणे ही महिला जामनेर येथून भुसावळला जाण्यासाठी बसली. तिला बस कुऱ्हा गावाजवळ आल्यावर आपले पर्समध्ये ठेवलेले चार तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे आढळून आले. त्याबाबत तिने वाहकाकडे तक्रार केली असता वाहकाने त्याची दखल घेवून बस भुसावळ येथे थेट तालुका पोलीस ठाण्यात आणली. तिथे पोलिसांनी बसमधील सगळ्या प्रवाशांची झडती घेतली. प्राथमिक तपासणीत कुणाकडेच मंगळसूत्र आढळून आले नाही. दरम्यान हा गुन्हा जामनेर हद्दीत घडल्यामुळे त्याची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात करावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.