जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महा स्वच्छता अभियानास ३१ डिसेंबर २०२३ रोजी सुरूवात केली. या महा स्वच्छता अभियानात आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मंदीर स्वच्छता अभियान ही राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महा स्वच्छता अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीमध्ये २०५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ११४ प्रमुख मंदीरांमध्ये ही पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार मंदीर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ‘महा स्वच्छता अभियानास’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथून, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जामनेर येथून तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथून सुरूवात केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीमध्ये २१३ स्वच्छता वाहनांच्या माध्यमातून २७८९ कर्मचारी व हजारोंच्या संख्येने नागरिक, पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत तब्बल २०५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव,चोपडा, अमळनेर, जामनेर, पाचोरा, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, सावदा, रावेर, यावल व नशिराबाद या नगरपरिषदा तसेच बोदवड, मुक्ताईनगर व शेंदुर्णी या नगरपंचायतींनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
जिल्ह्यातील ११४ मंदीरात स्वच्छता अभियान
नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदीरात स्वत: स्वच्छता करत मंदीर स्वच्छता अभियानास देशपातळीवर सुरूवात केली. जळगाव जिल्ह्यातील ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख ११४ मंदीरात ही मंदीर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.