जळगाव प्रतिनिधी । आजाराला कंटाळून अक्सानगरातील २४ वर्षीय तरूणाने मामा, पित्याच्या डोळ्यांदेखत विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मेहरूणमधील छ. शिवाजी उद्यानात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इमरान खान अकिख खान (वय-२४) रा. अशोक किराणा दुकानासमोर अक्सा नगर जळगाव हा तरूण आई, वडील, पत्नी बहिणीसोबत राहतो. एमआयडीसीतील कपाट बनविण्याच्या दुकानात कामाला आहे. गेल्या पाच ते महिन्यांपासून त्याला दुर्धन आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तो सतत तणावात राहत होता. आज दुपारी १२ वाजता कुटुंबियांसह जेवण केले. त्यानंतर डोकं दुखत होते. म्हणून बाहेर फिरण्याच्या निमित्ताने मामा आशिफ शेख अब्दुल गफ्फार आणि वडील अकील खान यांच्यासोबत दुपारी ३.३० वाजता मेहरूण मधील छत्रपती शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याचेवडील व मामा दोघे गप्पा मारत होते. दरम्यान, उद्यानात असलेल्या वापर नसलेल्या विहिरीजवळ तो फीरत होता. मामा आशिफ शेख आणि वडील अकील खान यांच्या डोळ्यांदेखत अचानक त्याने विहिरीत उडी घेतली.
दोन तास बचाव कार्य
इमरान खान याने ३.४५ वाजता विहिरीत उडी घेतली त्यानंतर १५ मिनीटात महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, महापालिकेचे कर्मचारी देवीदास सुरूवाडे, प्रकाश चव्हाण, भगवान पाटील, सरदार पाटील, हिरामण बावस्कर यांनी शोधमोहिम सुरू केली. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत इमरानचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी एमआयडीसी पोलीस पथक घटनास्थळी दाखलझाले होते. परिसरातील तरूण व नागरीकांची प्रचंड गर्दी जमली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन महिन्यापुर्वीच झाला होता विवाह
दोन महिन्यापुर्वीच इमराचे लग्न झाले होते. घरात आई व वडील आजारी राहत होते. त्यातच त्याला दुर्धर आजार जडला होता. त्याच्या पश्चात आई सुगराबी, वडील, बहिण, पत्नी हिनाबी असा परिवार आहे.