धानोरा येथील धरणात मामा-भाच्यांचा बुडून मृत्यू

जळगाव जामोद, प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात मामा व दोन भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

सविस्तर माहिती अशी आहे की, तालुक्यातील धानोरा येथील महासिद्ध लघु  (हत्ती पाऊल धरणात) प्रकल्पात मामा व दोन भाच्यांची बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. पुणे येथे नोकरीवर असलेला विनायक गाडगे (वय २७), त्याचा काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय १८) व त्यांचे दाताळा येथील मामा नामदेव वानखडे (४३) तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले. परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केला. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्थानकात दिली. धरण परिसरात शोध सुरू असतांना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याचे काठावर आढळून आले. तोपर्यंत रात्र झाल्यानें अंधारात शोध मोहिम थांबविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मुतदेह तरंगताना दिसले. पट्टीच्या पोहणाऱ्यांचा मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content