मालेगाव वृत्तसंस्था । शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा उद्रेक वाढत असून अनेक गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. सोमवारी मालेगाव शहर आणि तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १४० नवे रुग्ण आढळून आले असून त्यात ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे.
मालेगाव शहर आणि तालुक्यात रविवारी एकूण १११ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी शहरातील ३३ आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ जणांचा अहवाल सकारात्मक असल्याचे आढळून आले होते.
सोमवारी दोन टप्प्यांत एकूण ५३९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात १४२ जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यात शहरातील ७६, तालुक्याच्या ग्रामीण भागातील ६४ आणि बागलाण तालुक्यातील राजपूरपांडे आणि ठेंगोडा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नव्याने आढळून आलेले शहरातील रुग्ण हे प्रामुख्याने संगमेश्वर, मालेगाव कॅम्प आणि सोयगाव भागातील आहेत.
ग्रामीण भागात रविवारी झोडगे, कौळाणे गाळणे, वाके, निळगव्हाण, कंधाणे आणि वडनेर येथे रुग्ण आढळून आले होते. सोमवारी पुन्हा खाकुर्डी येथे १५, रावळगाव येथे १३, अजंग येथे सात, वडेल येथे पाच, झोडगे येथे चार, लखाणे येथे तीन रुग्ण आढळून आले. तसेच दहिवाळ, वडगाव,वाके, देवारपाडे येथे प्रत्येकी दोन तर निंबायती, येसगाव, कंधाणे, शिरसोंडी, दसाने, निमगाव, नांदगाव, टेहरे आणि वळवाडे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
ग्रामीण भागात आतापर्यंत अनेक गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असून रोज नवीन गावे कवेत येत असल्याचे दिसत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.