मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा – राज ठाकरे

Raj Thackeray

 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राला आज सक्षम, प्रबळ आणि कोणासमोरही न झुकणार्‍या विरोधी पक्षाची गरज असून ती संधी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनसेच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेतून जनतेला केले.

राज यांची पहिली प्रचारसभा बुधवारी पुण्यात होणार होती. मात्र पावसामुळे ती रद्द करावी लागली. त्यानंतर मुंबईत सांताक्रुझ येथे झालेली त्यांची सभा ही शुभारंभाची ठरली. या सभेत अवघ्या 15 मिनिटांच्या भाषणात त्यांनी राज्यात सत्ता नव्हे तर विरोधी पक्षाचे स्थान मिळेल इतके बळ मनसेला देण्याचे आवाहन मतदारांना केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तो दाखला देत, आज सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. म्हणूनच मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. येत्या १० दिवसांत माझ्या १८ ते १९ सभा होणार आहेत. या प्रत्येक सभेत मी ही एकच मागणी करणार आहे, असे राज यांनी सांगितले.

विरोधी पक्षासाठी मतदान करा, अशी भूमिका मांडणारा मनसे हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील पहिल पक्ष असेल, असेही राज यावेळी म्हणाले. माझा आवाका मला माहीत आहे. त्यामुळे आताच मला सत्ता हवी, असे मी म्हणणार नाही. सत्ता आवाक्यात असेल तेव्ही ते मागणं घेऊन मी नक्कीच तुमच्यापर्यंत येईन. तूर्त मनसेला एक प्रबळ विरोधी पक्ष होण्यासाठी बळ द्या. मी दिलेल्या प्रत्येक उमेदवारात सरकारला जाब विचारेल इतकी आग आहे. तुमचे प्रश्न खंबीरपणे विरारू शकेल इतकी धमक आहे. मनसेचा विरोधी पक्षनेता झाला तर नक्कीच तो या सरकारला नामोहरम करेल, असा विश्वास राज यांनी बोलून दाखवला.

Protected Content