बुलढाणा प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात 19 व 20 मार्च रोजी जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये प्रामुख्याने गहू, शाळू, कांदा बीज, भाजीपाला, शेडनेट व फळपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीबांधव पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिले आहे. सदर अहवाल शासनाकडे सादर होताच शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यात येईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये, शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे. असे आवाहन देखील अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.