मुंबई, वृत्तसंस्था | महाविकास आघाडीचे १६२ आमदार आज (दि.२५) संध्याकाळी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये जमणार आहे. या हॉटेलमध्ये १६२ आमदारांची उपस्थिती असेल. आम्ही १६२ असा एक मेसेज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. अगदी तसेच ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनीही केले आहे.
रेनेसाँ या हॉटेलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हलवण्यात आले आणि ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेनेचे सगळे आमदार हे ‘हॉटेल ललित’ या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काँग्रेसनेही त्यांचे आमदार जयपूर आणि भोपाळला नेले आहेत. आत आज संध्याकाळी सगळे म्हणजेच १६२ आमदार ग्रँड हयातमध्ये जमणार आहेत.
महाविकास आघाडीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावरही सहमती झाल्याचं शरद पवार यांनी सांगितले. मात्र शनिवारची सकाळ उजाडली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ घेतली.
महाराष्ट्रात झालेला हा राजकीय भूकंप हा सगळ्यांसाठीच धक्का होता. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद करुन आणि काँग्रेसने आणखी एक पत्रकार परिषद करुन भाजपावर निशाणा साधला. हे सगळे प्रकरण कोर्टातही गेले आहे. आता मंगळवारी सकाळी १०.०० च्या दरम्यान या संदर्भातला निकाल येऊ शकतो. दरम्यान या तीन दिवसात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ग्रँड हयात मध्ये काय काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.