Home क्राईम शेळावे गावात सरकारी योजनांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार; सरपंच पतीविरोधात तक्रार

शेळावे गावात सरकारी योजनांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार; सरपंच पतीविरोधात तक्रार

0
154

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शेळावे गावातील सरपंच पती आणि ग्राम रोजगार सेवक याने गावातील गोरगरीब, निराधार, अपंग, विधवा आणि अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना रोजगार हमी आणि घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रत्येकी १० ते १५ हजार रुपये रोख घेवून फसवणूक केली आहे. तक्रार देवूनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गावातील महिलांनी शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा तालुक्यातील शेळावे येथील ग्राम रोजगार सेवक अमोल पाटील यांनी गावातील ग्रामसेवक यांच्या मदतीने गावातील गोरगरीब, निराधार, अपंग, विधवा आणि अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना रोजगार हमी आणि घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रत्येकी १० ते १५ हजार रुपये रोख घेतले. मात्र, कोणताही लाभ दिला नाही. एवढंच नव्हे, तर नागरिकांच्या बँक खात्यात आलेला योजनेचा पैसाही त्यांनी परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात केवळ नागरिकांचीच नव्हे, तर शासनाची आणि बँकांचीही फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

या गैरव्यवहाराबाबत नागरिकांनी विचारणा केली असता, अमोल पाटील यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी या प्रकरणावर प्रश्न विचारला असता, अमोल पाटील यांनी त्यांना हात पकडून बाहेर काढले आणि अश्लील शिवीगाळ केली. या घटनेनंतर पीडितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, तरीही आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पीडितांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि पीडित नागरिकांना संरक्षण व न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound