Home क्राईम मोठी कारवाई : अवैध दारू विक्रेते दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार !

मोठी कारवाई : अवैध दारू विक्रेते दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार !


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी सण-उत्सव आणि २०२६ च्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पाचोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सुनिल पांडुरंग पारधी (रा. फत्तेपूर, ता. जामनेर) २) विजय पांडुरंग पारधी (रा. फत्तेपूर, ता. जामनेर) असे हद्दपार असलेल्या दोन्ही सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांविरुद्ध फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये अवैध रित्या दारू गाळणे आणि ती बाळगणे या संदर्भात गंभीर गुन्हे दाखल आहेत. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने आणि आगामी निवडणुकांच्या काळात सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता असल्याने, त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तयार केलेला हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा कार्यालयाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर, श्री. विनय गोसावी (उपविभागीय दंडाधिकारी) यांनी या दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर काढण्याचे आदेश पारित केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम आणि फत्तेपूरचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी यशस्वीपणे राबवली आहे.


Protected Content

Play sound