Home क्राईम मोठी कारवाई : अवैध शस्त्र विक्री प्रकरणात ७ संशयीतांना अटक, ८ गावठी...

मोठी कारवाई : अवैध शस्त्र विक्री प्रकरणात ७ संशयीतांना अटक, ८ गावठी पिस्टल जप्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री आणि बाळगणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून आठ गावठी पिस्टल, दहा जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रांच्या व्यवहाराचा मोठा भांडाफोड झाला आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिनांक १ मार्च २०२६ रोजी पहाटे १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत यश रामदास नन्नवरे हा जळगावातील इंडिया गॅरेज परिसरात गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत भज्जी गल्ली परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल मिळून आले.

पोलिसांनी यश नन्नवरे याची कसून चौकशी केली असता त्याने ही पिस्टल वरणगाव येथील केशव सुनिल भालेराव याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी केशव भालेराव याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही पिस्टल समाधान बळीराम निकम, रा. अंजाळा ता. यावल याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समाधान निकम याचा शोध घेतला असता तो जामनेर तालुक्यातील नेरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीदरम्यान त्याने मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून विविध ठिकाणी विक्री करत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अनेकांना पिस्टल विकल्याचे समोर आले.

या तपासात गौरव देविदास साळवे, विकास प्रकाश काकडे, जगदीश गजानन महाजन आणि कैलास राजेंद्र माळी या आरोपींनाही अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण आठ गावठी पिस्टल, दहा जिवंत काडतुसे आणि एक होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्रमांक MH19 CM 1312) जप्त करण्यात आली आहे. जप्त शस्त्रांची अंदाजे किंमत प्रत्येकी सुमारे ३५ हजार रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या आरोपींपैकी काही जणांविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी समाधान निकम हा पाचोरा पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न आणि यावल पोलीस ठाण्यातील आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातही हवा असलेला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच केशव भालेराव याच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्येही तो वाँटेड असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक गोपाल देशमुख, महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, तसेच पोलीस कर्मचारी राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे आणि नरेंद्र दिवेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत असून या अवैध शस्त्र पुरवठा साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जळगाव शहरात अवैध शस्त्रांच्या व्यवहारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound