जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात माजी उपसरपंच युवराज कोळी या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आले असून उर्वरित दोन जणांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना दिली आहे.
युवराज सोपान कोळी वय–३५, रा.भादली ता.जळगाव असे मयत तरुणाचे नाव असून ते आपल्या आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांसह भादली गावात वास्तव्याला होते. दरम्यान ३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी याचे ढाब्यावर भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत वाद झालेला होता. त्यानंतर याच कारणावरून गुरुवारी २० मार्च रोजी रात्री १० वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात वाद झाला. हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास युवराज कोळी हा त्याची आईवडील यांच्यासोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होता. त्यावेळी संशयित आरोपी भरात पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी याच्यावर वार केले. दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर गावामुळे युवराज जागेवरच कोसळला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्यांचे वडील सोपान कोळी आणि आई याने देखील धाव घेतली. परंतु देवा आणि हरीश या दोघांनी दोघांना पकडून ठेवले होते. आई-वडिलांच्या डोळ्यात एकच मुलाचा हा खून करण्यात आला होता. दरम्यान परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनांसाठी धाव घेतली. तोपर्यंत भरत पाटील, देवा पाटील आणि हरीश पाटील हे मारेकरी पसार झाले होते. जखमी अवस्थेत असलेल्या युवराज कोळी तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची वार्ता करताच त्याच्या आई आणि वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.
युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असून कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच होते. कार्यकर्त्याचा खून झाल्याचे कळल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी भरत पाटील याला अटक करण्यात आली आहे तर उर्वरित दोघांचा शोध घेणे सुरू आहे.