अयोध्या-वृत्तसंस्था | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह अयोध्येचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. यात त्यांनी रामललाच्या दर्शनासह विविध ठिकाणी दर्शन घेतले. तर अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याची महत्वाची घोषणा देखील त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून अचूक नियोजन केले होते. याचीच फलश्रुती म्हणून ठाकरे यांचा आजचा दौरा चांगलाच गाजला. दिवसभरात विविध मंदिरांमधील दर्शन घेऊन त्यांनी सायंकाळी महाआरती केली. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला.
या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, ही आमची तीर्थयात्रा आहे. राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाहीत, दर्शन घ्यायला आलेलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उद्धव ठाकरे बोलणार आहेत, पत्रव्यवहार करणार आहेत. या पावनभूमीत महाराष्ट्र सदनसाठी देखील जागा बघणार आहेत. साधारणपणे शंभर खोल्यांचं महाराष्ट्र सदन इथे आम्हाला बनवायचं आहे. महाराष्ट्रातील इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक जागा इथे निर्माण करायची आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही अयोध्येत चौथ्यांदा येत आहोत. उत्साह आणि जल्लोष तसाच येत आहे. मंदिर निर्माण होत असताना अजून शिवसैनिक इथे रामलल्लांचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. आज येथे शिवसैनिकांचे अपूर्व उत्साह दिसून आल्याचे देखील त्यांनी नमूद केले.