जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मांतर’ या विषयावर प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या संचालक प्रा.डॉ. अर्चना देगावकर या होत्या तर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.उमेश गोगाडीया, डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रा.विजय घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलतांना प्रा.डॉ. अनिल डोंगरे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवशी बौद्ध धम्माचा स्वीकार करुन आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. व्यक्ती, समाज आणि राष्ट्रहिताच्या दृष्ट्रीने बौद्ध धम्म तत्वे आवश्यक असून बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे, एक विशुध्दीचा मार्ग आहे व मानवाच्या सर्वांगीण प्रगती साधण्यासाठीचे आयुधे आणि साधने या बौद्ध धम्मात सांगीतले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ.अर्चना देगावकर म्हणाल्या की, तथागत गौतम बौद्धांनी जगाला करूणा, मैत्री, शांती, अहिंसा व विज्ञानवादी संदेश दिला. बुद्ध धर्म हा एक क्रांतिकारी धर्म असून आत्मा, ईश्वर यांचा आधार घेऊन तत्कालील कालखंडात समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यांचे स्तोम वाढल्याने बौद्ध धम्माचा उदय झाला. व समाजास विज्ञानवादी दृष्टी, करूणा, मैत्री, शांतीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस स्नेहा जाधव व शारदा बाविस्कर यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय घोरपडे यांनी तर सुत्रसंचालन विद्यार्थी समाधान वाघ यांने केले. विक्की साळवे याने आभार मानले.