जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो. त्यामुळे जरांगे फॅक्टर बाहेरच नाही काढला, तर फेल कसा होणार? महायुती सरकारमध्ये जेवढे आमदार निवडून आले आहेत, ते सर्व मराठ्यांमुळे आलेत, असा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारने आता मराठ्यांशी बेइमानी करू नये. मराठा आरक्षण तातडीने द्या, अन्यथा मराठे तुमच्या छाताडावर बसतील, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
रविवारी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले की, कोणत्या घटकाने काय श्रेय घ्यावे हा त्यांचा-त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानातच नाही, आणि तुम्ही आमचा फॅक्टर फेल झाला कसं म्हणता, असा सवाल करत कोण पडला, कोण निवडून आला याचं आम्हाला घेणं-देणं नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. मी येवल्यात सांत्वन भेटीसाठी आलो होतो. हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलंय. आम्ही मैदानात पाहिजे होतो, मग तुम्हाला दाखवलं असतं. आम्हाला मराठ्यांना काही सोयरसुतक नाही, कोणीही आला तरी आम्हाला घेणं-देणं नाही. सरकार तुमचं आहे, आता तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे आवाहन जरांगे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना केले.
मराठा आरक्षण तातडीने द्या, अन्यथा मराठे तुमच्या छाताडावर बसतील. आम्ही सामूहिक उपोषणाला बसणार आहोत. सरकार आलं त्यांना शुभेच्छा आहेत. कोणाची जरी सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. पालकत्व तुमच्याकडे आहे. सरकारने मराठ्यांशी बेइमानी करायची नाही, अन्यथा भोग भोगावे लागतील. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. राजकारण्यांच्या दहशतीपासून मी मराठ्यांना बंधनमुक्त केलं. कोणाचंही सरकार येऊ द्या, मी माझी लढाई सुरू ठेवणार. आम्ही जर मैदानात असतो तर मराठ्यांनी धुरळा केला असता. मैदानात नसणा-या माणसाला तुम्ही म्हणताय की जरांगे फॅक्टर फेल झाला. आमचा कोणाच्याच उमेदवारावर राग नाही. आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं आहे, असे जरांगे म्हणाले.