मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआने आज राज्यभर जोडे मारो आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. मविआ आज मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करत आहे. दरम्यान, या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही. तर मविआच्या आंदोलनाला महायुतीही ‘खेटरं मारो’ आंदोलनातून प्रत्युत्तर देत आहे.
मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. मविआच्या याच आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सहभाग घेत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर घाणाघात केला आहे. नागपूरच्या महाल येथील शिवतीर्थ परिसरात चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले असून मविआच्या जोडे मारो आंदोलनाच्या विरोधात भाजपने खेटरं मारो आंदोलन पुकारले असून बदमाशी करणा-या मविआला आम्ही खेटरं मारत असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज राज्यभरात महायुतीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सा-यांसाठी वंदनीय आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली, देशातील तमाम शिवभक्तांचीही माफी मागितली. शिवरायांचे स्मारक दुर्घटनेत ज्या ज्या व्यक्तींच्या हृदयाला ठेच पोहोचली त्यांची देखील माफी मागितली. तरीदेखील महाविकास आघाडीचे नेते राजकारण करत असून निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात अराजक पसरवण्याचे काम करत आहेत.