नागपूर, वृत्तसंस्था | भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी आज (दि.७) येथे व्यक्त केली. इतकंच नाही तर १०५ जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच होईल, असाही विश्वास नितीन गडकरींनी यावेळी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असेही गडकरींनी स्पष्ट केले.
यावेळी गडकरींना तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता अशी चर्चा रंगली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, मी केंद्रात काम करतो आहे, मुख्यमंत्रीपदासाठी मी उत्सुक नाही. गडकरी हे शिवसेनेची समजूत घालू शकतात, असा अंदाज माध्यमांकडून व्यक्त करण्यात येत होता. आज ते नागपुरात दाखल झाले, तेव्हा त्यांना सत्तास्थापनेबाबत विचारण्यात आले. तेव्हा भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होतील, असेही ते म्हणाले.