Home Cities जळगाव प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांची प्रचारार्थ रॅली ; ठिकठिकाणी स्वागत 

प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांची प्रचारार्थ रॅली ; ठिकठिकाणी स्वागत 


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. बुधवारी, ७ जानेवारी रोजी प्रभाग १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन सपके आणि सुरेखा नितीन तायडे यांनी प्रभागातील प्रभागात जोरदार शक्तीप्रदर्शन करत जनसंपर्क दौरा केला.

विकासाचा लेखाजोखा :

मतदारांसमोर प्रभाग १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन सपके आणि सुरेखा नितीन तायडे यांनी आज प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या कार्यकाळातील कामांचा पाढा वाचला. “मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने आम्ही हवेत विरून जाऊ दिली नाहीत.

प्रभागातील जवळपास ७० टक्के अत्यंत महत्त्वाची विकासकामे महायुतीने पूर्ण केली आहेत,” असा दावा उमेदवारांनी यावेळी केला. रस्ते, पाणी आणि गटारींच्या प्रश्नांवर झालेली कामे हीच आमची खरी पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

उर्वरित कामांसाठी वचनबद्धता :

प्रचारात केवळ जुन्या कामांचे कौतुक न करता, भविष्यातील नियोजनावरही उमेदवारांनी भर दिला. “काही तांत्रिक कारणांमुळे जी कामे रखडली आहेत, ती येत्या काळात प्राधान्याने आणि वेगाने पूर्ण केली जातील,” असे आश्वासन प्रफुल्ल देवकर आणि नितीन सपके यांनी दिले. नागरिकांच्या समस्या जाणून घेताना उमेदवारांनी प्रत्येक गल्लीतील लहान-मोठ्या अडचणी नोंदवून घेतल्या.

प्रचाराला वाढता पाठिंबा :

महायुतीच्या या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. “आम्ही केवळ निवडणुकांपुरते दिसत नाही, तर कायम लोकांच्या सुख-दुःखात सहभागी असतो,” असे सुरेखा तायडे यांनी सांगितले. विकासाची ही सातत्यपूर्ण प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीलाच संधी द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रचारामुळे प्रभाग १३ मध्ये महायुतीचे पारडे जड झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


Protected Content

Play sound