Home उद्योग महावितरणची ऐतिहासिक झेप : केंद्र सरकारच्या मानांकनात देशात पहिला क्रमांक 

महावितरणची ऐतिहासिक झेप : केंद्र सरकारच्या मानांकनात देशात पहिला क्रमांक 

0
151

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने जाहीर केलेल्या मानांकनामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने १०० पैकी ९३ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ही गौरवशाली कामगिरी महाराष्ट्राच्या ऊर्जा धोरणांची, नियोजनशक्तीची आणि सेवाभावाची साक्ष देणारी ठरली आहे.

महावितरणच्या या उल्लेखनीय यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कार्यक्षम प्रशासनासह महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते, असे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे. ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनानेही या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आरईसी आणि पॉवर फाऊंडेशन ऑफ इंडिया यांनी देशातील वीज वितरण कंपन्यांचे पाच प्रमुख निकषांवर आधारित मूल्यांकन केले. संसाधन पर्याप्तता, ऊर्जा परिवर्तन, नियामक प्रशासन, आर्थिक स्थैर्य आणि जीवन सुलभता/व्यवसाय सुलभता या घटकांवर गुणांकन करण्यात आले. यामध्ये महावितरणने संसाधन पर्याप्तता, ऊर्जा परिवर्तन आणि नियामक प्रशासन या तीन घटकांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवत बाजी मारली.

राज्यातील वाढती वीज मागणी लक्षात घेता, महावितरणने ऊर्जा विभागाच्या मदतीने पुढील पाच वर्षांसाठी ऊर्जा आराखडा तयार केला. या आराखड्यात ४५,००० मेगावॅट वीज खरेदीसाठी करार करण्यात आले असून, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे अंदाजे ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार असून सर्व ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे.

याचबरोबर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना गेम चेंजर ठरणार आहे. महाराष्ट्राने देशात सर्वाधिक सौर पंप बसविण्यातही आघाडी घेतली आहे. याशिवाय, आरडीएसएस योजनेतून राज्यात वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे कामही गतिमान झाले आहे.

या सर्व योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि आर्थिक नियोजन यामुळेच महावितरणने एकूण १०० पैकी ९३ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि छत्तीसगड यांनी आपापले स्थान निश्चित केले आहे.


Protected Content

Play sound