मुंबई प्रतिनिधी । महावितरणचा पूर्ण कारभार आता मराठी भाषेतूनच होणार असून याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करावा असे राज्य सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. तथापि, महावितरण कंपनीत आजवर मराठीऐवजी इंग्रजीला प्राधान्य दिले जात होते. दैनंदिन नोट, परिपत्रक इंग्रजीतून असल्याने अनेक कर्मचार्यांना त्याचा अर्थबोध होत नव्हता. यामुळे कामात अडथळे येत होते. याबाबत कामगारांकडून झालेल्या तक्रारीची दखल घेत या पुढील सर्व कारभार मराठी भाषेतून करावा असे लेखी आदेश काढले आहेत.
महावितरण राज्यभर वीज वितरण करत असून त्यामध्ये सुमारे ६५ हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे कंपनीचा कारभार मराठीतून होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ताजे आदेश हे मराठीची गळचेपी थांबविणारे ठरतील अशी अपेक्षा आहे.