महाराष्ट्राचा राज्यमासा नामशेष होण्याच्या मार्गावर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेट संकटात आहे. लवकरच पापलेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने याबाबत लवकर पावले उचलावीत अशी मागणी मच्छिमार संघटनेने केली आहे. पालघरच्या समुद्रात पापलेट मासे मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र याच राज्यमाशांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे यांवर बंदी असून याबाबत दंडात्मक कारवाईची तरतूदही आहे. तरीही माशांची पिल्लेही पकडली जात आहेत. त्यामुळे राज्यमाशाचा दर्जा मिळूनही, पापलेटच्या संवर्धनासाठी अपेक्षित पावले न टाकल्यास हा मासा कायमचा नष्ट होऊ शकतो, अशीही भीती मच्छिमार व्यक्त करत आहेत.

राज्य सरकारने माशांच्या पिलांना जाळ्यात न पकडणे, बाजारात पिलांचा व्यवहार टाळणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र तारली, बांगडा हे मासे पकडण्यासाठी पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यात येत आहे. तळकोकणात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत हे मासे अधिक आढळतात.

पालघर जिल्ह्यात पापलेट माशांच्या लहान पिलांची कत्तल होत असल्याचे समोर आले आहे. माशांच्या छोट्या पिलांची होणारी ही कत्तल वेळीच थांबली नाही तर राज्यमासा असलेल्या पापलेटचे अस्तित्व संकटात सापडणार आहे. पापलेट माशांच्या घटत्या संख्येची आकडेवारी चिंताजनक आहे.

सातपाटी येथे २०२३ मध्ये १०७ टन पापलेट सापडला होता. पण २४ मध्ये फक्त ६३ टन पापलेट मासा सापडला होता. वादळे, सागरी पर्यावरणीय समस्या, सागरी प्रदूषण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माशांच्या पिलांची होणारी कत्तल यामुळे सिल्व्हर पापलेटचे प्रमाण कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील या पापलेटची मागणी आहे. गेल्या काही दशकांमध्ये केवळ या पापलेटचे उत्पादन जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.

मच्छिमारांच्या जाळ्यात चंदेरी पापलेट सापडणे ही त्यांच्यासाठी लॉटरीच असते. कोकणातील सर्वच किनारपट्टीवर हा मासा आढळतो. मात्र पालघरच्या सातपाटीत या माशांचे प्रमाण मुबलक आहे. पापलेट मासा लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे त्याची चव. हा मासा शिजवल्यानंतर त्याला चव छान होते. त्यामुळे हा मासा खवय्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

Protected Content