मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खान्देश लोककलावंत परिषद व व. वा. वाचनालयाच्या सहकार्याने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. मराठी भाषेच्या गोडव्याचा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमात विविध लोककला सादर करण्यात आल्या.

कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. उद्घाटन व. वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रारंभी खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे व त्यांच्या समूहाने महाराष्ट्र राज्यगीत सादर करून सभागृहात उत्साह संचारला.

या कार्यक्रमात वहीगायन, पोवाडा, भारुड, गोंधळ आणि लावणी या अस्सल लोककलांचे सादरीकरण झाले. जळगावच्या वाल्मीक वही मंडळाने संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गणपतीची वही आणि कानबाईची वही सादर करत विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध केले. वीररसाने भारावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा शाहीर विनोद ढगे यांनी पेश करताच उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजीचा निनाद केला. त्यानंतर भारुडाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश हास्याच्या अंगाने देत सामाजिक प्रबोधन करण्यात आले.

गोंधळ परंपरेचे दर्शन जळगावच्या अवधूत वामन दलाल व जयमल्हार गोंधळ पार्टीने घडवले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजराने वातावरण भारावले. त्यानंतर मेघा बारी या विद्यार्थिनीने लावणी या लोककलेचा परिचय करून दिला आणि किरण राजू बहारे हिने ‘ठसकेबाज चंद्रा’ ही लावणी सादर करत सर्वांना मोहवून टाकले. शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थिनींनी लावणीला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषा आणि लोककला यांच्या महत्त्वावर डॉ. सत्यजित साळवे यांनी प्रकाश टाकला. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी वाचनालयाच्या भूमिकेवर भर दिला. अनिलभाई शाह यांनी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचा अनुबंध उलगडून दाखवला. प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी भाषा म्हणजे आईसारखी प्रिय असल्याचे सांगत भाषेच्या जपणुकीचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी मराठी भाषा आणि लोककलेच्या अतूट नात्यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले, तर आभार कल्पना खेडकर यांनी मानले. विशेष म्हणजे दीडशे विद्यार्थिनी भगव्या फेट्यात आणि पारंपरिक मराठमोळ्या वेषात सहभागी झाल्याने कार्यक्रम अधिक देखणा झाला.

Protected Content