मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात पावसाचे थैमान घातले असून १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असला तरी सरकार कुठेही दिसत नाही. यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
याप्रसंगी खासदार संजय राऊत म्हणाले की, पहिल्यांदाच एक आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपती होणार असल्याने त्यांना पाठींबा द्यावा अशी शिवसेना खासदारांची अपेक्षा होती. त्यानुसार आम्ही पाठींब्याचा निर्णय घेतला. याआधी आम्ही प्रतिभाताई पाटील यांना देखील रालोआच्या निर्णयाच्या विरूध्द मतदान केले होते. त्या मराठी म्हणून आम्ही मतदान केले होते. यानुसार आता आदिवासी महिला म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. राज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असून आमचे अनेक आमदार आणि खासदार व पदाधिकारी हे आदिवासी असून त्यांच्या भावना समजून आम्ही हा निर्णय घेतला आहे. यात कोणताही राजकीय विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
संसदेने काही अपशब्दांवर बंदी घातली असून गद्दार हा शब्द असंसदीय नसतांनाही यावर बंदी घालण्यात आल्याची बाब अनाकलनीय असल्याचेही संजय राऊत म्हणाले. भ्रष्ट हा शब्द देखील बंदी घालण्यात आल्याचे आश्चर्य वाटल्याचे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री कार्यालय कार्यरत झाले नसून महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनकडे गेल्याची टीका त्यांनी केली. राज्यात १०० पेक्षा जास्त लोक वाहून गेले, कॉलरा आणि साथ रोगांचे थैमान असून देखील सरकार मूग गिळून बसले आहे. कारण हे सरकार बेकायदेशीर असल्याचा त्यांनी पुन्हा दावा केला. अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे मंत्रीमंडळाचा शपथविधी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राज्यात अनेक संकटे असतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आहेत तरी कुठे ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला राज्यपाल खूप मार्गदर्शन करत होते. आता १२ दिवसांपासून राज्यपाल कुठे आहेत असे ते म्हणाले.