जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन राज ठाकरे सध्या राज्यभर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकारणाच्या क्षितिजावरून नाहीसे करा. असे याआधीच सांगत राज ठाकरे यांनी भाजपच्याविरोधात जोरदार आघाडी उघडलेली आहे. यालाच अनुसरून मुंबईत मनसेचे अनेक पदाधिकारी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा उघड प्रचार करताय. परंतु जळगावात मनसेने कुठेही प्रचारात सहभाग घेतलेला दिसून येत नाहीय. त्यामुळे जळगावात मनसे कुणासोबत ? असा प्रश्न प्रश्न निर्माण झालाय.
भाजपचे उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येता कामा नयेत असे राज ठाकरे यांनी सांगितल्याने मनसैनिक त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. शिवसेना-भाजपवर सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांबद्दल नरमाईची भूमिका घेतली आहे. याचा प्रत्यय दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी मनसे कार्यालयाच्या शाखेला भेट दिल्यावर आला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मिलिंद देवरा यांचे पुष्पहार घालून स्वागत केले होते. यावेळी उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी मनसे-काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मिलिंद देवरा यांच्या प्रचार रॅलीत मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन परिसरातील जनतेला केले. तर दुसरीकडे मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात संदीप देशपांडे व काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी एकत्रित मॉर्निंग वॉक करीत लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. आधी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करणाऱ्या मनसेने आता मिलिंद देवरा यांचा प्रचार केल्याने मनसेचे कार्यकर्ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकीकडे महाराष्ट्रात मनसे उघडपणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करत असतांना दुसरीकडे मात्र, जळगाव जिल्ह्यात मात्र, मनसेने आता पर्यंत कोणत्याही उमेदवाराला पाठींबा दिला नाहीय. किंबहुना त्यांच्या प्रचारात सहभागी देखील झालेले नाहीय. त्यामुळे मनसे नेमकी कुणासोबत असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवेळी जळगाव महापालिकेत मनसेचे तब्बल १२ नगरसेवक होते. परंतु महापालिका निवडणूक लागण्याआधी सर्वांनी मनसेचा राजीनामा देत पक्षांतर केले होते. जळगाव जिल्ह्यात राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्या सभा भाजपला मोठ्या प्रमाणात अडचणीत आणत आहेत. राज यांनी पुराव्यानिशी पंतप्रधान मोदी आणि शहा जोडीवर केलेले हल्ले भाजपला घायाळ करताय. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद देखील मिळतोय. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्यास त्याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, यासंदर्भात जळगावमधील मनसेचे वरिष्ठ नेते जमील देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज साहेबांनी सांगितल्या प्रमाणे मोदी सरकार विरोधात आम्ही लोकांना मतदान करायला सांगतोय. परंतु कोणाला मतदान करावे हे सांगत नाहीय. भविष्यात राज साहेबांचा आदेशाप्रमाणे काम करू. एकंदरीत मनसे अंतिम दिवसात आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. परंतु तूर्त तर मनसे जळगावात कुणासोबत असा प्रश्न सर्वाना पडलाय.