मुंबई प्रतिनिधी । उध्दव ठाकरे सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रीमंडळ विस्ताराची जय्यत तयारी करण्यात आली असून यात नेमके खातेवाटप कसे होणार याची उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.
उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांच्यासह प्रारंभी तिन्ही घटक पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर आज दुपारी उर्वरित मंत्री शपथ घेणार आहेत. यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संभाव्य मंत्र्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. तर प्रत्येकाच्या मतदारसंघात जल्लोषाची तयारीदेखील करण्यात आलेली आहे. एकीकडे मंत्रीमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण झाली असतांनाच दुसरीकडे खाते वाटपाबाबत उत्सुकता निर्मित झाली आहे. यात कुणाला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरं तर, आधीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाने खातेवाटपात आपापल्याकडे येणार्या खात्यांची विभागणी केली आहे. तथापि, यातील एखाद-दुसरे खाते बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने गृहनिर्माण व नगरविकास खात्यांची मागणी केली असली तरी यावर अद्याप एकमत झालेले नाही. तसेच अजित पवार यांना नेमके कोणते खाते मिळणार याबाबतचही उत्सुकता शिगेला पोहचली आहे.