मुंबई-वृत्तसेवा | देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश जीडीपीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुंतवणूक आणि शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या प्रमुख ऑनलाइन ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म soic.inच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 15.7 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे तर उत्तर प्रदेश 9.2 टक्के, तामिळनाडू 9.1 टक्के, गुजरात 8.2 टक्के आणि पश्चिम बंगाल 7.5 टक्के, कर्नाटक 6.2 टक्के, राजस्थान 5.5 टक्के, आंध्र प्रदेश 4.9 टक्के आणि मध्य प्रदेशचा 4.6 टक्के वाटा आहे.
सध्या देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत आहे. राज्याचा जीडीपी 430 अब्ज डॉलर्स आहे. जीडीपी वाढीचा दर हा साडेआठ टक्के आहे. महाराष्ट्र सरकारने 2030 पर्यंत आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्याला अर्थव्यवस्था 11 टक्के वेगाने वाढवावी लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रावर सर्वाधिक काम करावे लागणार आहे.
एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरू शकते. याचे कारण या राज्यात औद्योगिक उत्पादन देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहराचा जीडीपी देशात सर्वाधिक आहे.