जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य असून प्रशासकीय परिपत्रकाचा नियमभंग केलेला आहे. बदली प्रक्रियेची चौकशी होइस्तोवर आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केली आहे. त्याकरिता गुरुवारी ६ जुलै रोजी सकाळी विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कामगार महासंघाने ४ जुलै रोजी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. या वर्षीपासून जळगाव विभागातील अनागोंदी कारभार समोर आलेला दिसून येत आहे. प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र या परिपत्रकाला जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या १५ कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या नियमबाह्य करण्यात आलेल्या आहेत.
महावितरणच्या जळगाव विभागाने प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य पद्धतीने केल्या असून या बदली प्रक्रियेची चौकशी होईस्तोवर त्याला स्थगिती मिळणे गरजेचे आहे. याबाबत पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र तरीही बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना बदली ठिकाणी रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. या प्रशासनाच्या मुजोर व मनमानी पद्धतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ६ जुलै रोजी दीक्षित वाडी येथील वीजवितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे याकरिता अध्यक्ष भागवत कोळी व सचिव कमलेश सोनवणे यांनी आवाहन केले आहे.