जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे सुरू असलेल्या सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १९ पदकांची कमाई केली. यात १० सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी पदक पटकावत महाराष्ट्राच्या विजयी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. विजेत्यांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास आणि आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.
ही स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी अनुभूती स्कूलमध्ये सुरु झाली होती. १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटात झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील गटात महाराष्ट्राची दिशा मेहता सर्वोत्तम खेळाडू ठरली, तर १७ वर्षांखालील गटात कर्नाटक-गोव्याच्या पूर्विका एम हिने आणि १९ वर्षांखालील गटात उत्तर प्रदेशच्या दिवा गुप्ताने सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळवला.

महाराष्ट्राच्या वर्चस्वात जळगावच्या अनुभूती स्कूलच्या खेळाडूंनी मोलाची भर घातली. १९ वर्षांखालील ६८ किलो वजन गटात अलेफिया शाकीरने कांस्यपदक मिळवले, तर ४९ किलो गटात समृद्धी कुकरेजा हिनेही कांस्यपदक पटकावले. पलक सुराणा हिला रौप्यपदक मिळाले. या सर्व खेळाडूंनी आपल्या संयम, तंत्र व मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर पदके पटकावून शाळेच्या व जळगाव शहराच्या नावात भर घातली.
१७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मंजिरी तळगावकर हिने ६३ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. विरती बेदमुथा हिने ५२ किलो गटात सुवर्ण मिळवले, तर स्वस्तिका हिने ३५ किलो गटात सुवर्ण जिंकत राज्याच्या यशात भर घातली. सर्वज्ञा हिला ४९ किलो गटात रौप्य मिळाले. याशिवाय निया दोषी (६८ किलो) व अनेक खेळाडूंनी कांस्यपदके मिळवून एकूण पदकसंख्या १९ वर नेली.
या यशस्वी आयोजनासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे आणि प्रशिक्षक अजित घारगे, जयेश बाविस्कर, महेश घारगे, रवींद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, समीर शेख, मोहम्मद फजल, सुयश बुरकूल, किशोर सिंग, वाल्मिक पाटील, सोनाली हटकर, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, राहुल निभोंरे, सैय्यद मोहसीन, अब्दुल मोसीन जब्बार, योगेश धोंगडे आणि दिपिका ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केवळ पदकेच नाही तर तंत्रशुद्ध खेळातून इतर राज्यांच्या खेळाडूंना जोरदार टक्कर दिली. अनुभूती स्कूलने यजमान म्हणून जबाबदारी लीलया पार पाडत स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. महाराष्ट्रासाठी ही कामगिरी आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सकारात्मक संकेत देणारी ठरली आहे.



