मुंबई प्रतिनिधी । राज्यात महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले असून ते जनतेचे कल्याण करणार असल्याचा आशावाद आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे मुखमत्र असणार्या दैनिक सामनामध्ये महाराष्ट्र धर्माचे सरकार या शीर्षकाखालील अग्रलेखात भाजपला पुन्हा एकदा टोले मारले आहेत. यात म्हटले आहे की, शिवसेनेचा मुख्यमंत्री व त्यातही उद्धव ठाकरे या पदावर विराजमान होत आहेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. मराठी माणसाला धन्य वाटावे, कोणीही हेवा करावा असाच हा सोहळा आहे. उद्धव ठाकरे यांचे वैशिष्टय असे की, बाहेर वादळ असले की ते शांत राहतात व शांतता झाली की वादळ निर्माण करतात. देशातील भलेभले पुढारी दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकत आहेत असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी कोणताही दबाव जुमानला नाही. स्वाभिमान गहाण ठेवणार्या तडजोडी केल्या नाहीत व ज्यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला त्या ढोंगाशी हातमिळवणी केली नाही. सरकारने सरकारचे काम करावे आणि मागच्या चारेक दिवसांत काय घडले त्या चिखलात दगड न मारता विरोधी पक्षाने विधायक भूमिका बजावावी. लोकशाहीचे संकेत हेच आहेत. दहशत निर्माण करून सरकारे बनविण्याचे व पाडण्याचे खेळ पाच वर्षांत देशात झाले. महाराष्ट्र या सगळयांना पुरून उरला. महाराष्ट्राला काय हवे आहे, याचा विचार एकत्र बसून करण्याची वेळ आली आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत प्रगती आहे. हवा-पाण्यात कष्टाचा घाम आहे. मराठी माणूस आळशी नाही व तो फाजील अपेक्षाही ठेवत नाही. मात्र त्याला खोटेपणाची आणि ढोंगाची चीड आहे. त्याच चिडीतून आजचे सरकार अभिमानाची ज्वाळा उसळावी तसे जन्माला आले आहे. महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले. ते स्वराज्य सगळयांचे होते. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील. महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे. ते कसे येते ते पाहू असे जे सांगत होते त्यांनीही महाराष्ट्र धर्माचे मर्म एकदा तपासावे. उद्धवांचे सरकार सुरू होत आहे. त्यांना शुभेच्छा असे या अग्रलेखात म्हटले आहे.