जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज जैन हिल्स येथील परिश्रम हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे आणि जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध जिल्हा बुद्धिबळ संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर या सभेला उपस्थित होते.
या सभेत ‘चेस इन स्कूल’ या महत्त्वाच्या उपक्रमासह विविध दहा विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांना सर्वांच्या सहमतीने मंजुरी देण्यात आली. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या या सभेत, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्यावर सखोल चर्चा केली. उपाध्यक्ष फारूख शेख (जळगाव), निनांत पेडेनेकर (पालघर), सहसचिव अंकुश रक्ताडे (बुलढाणा), पुरुषोत्तम भिलारे (मुंबई) यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा असोसिएशनचे प्रत्येकी दोन पदाधिकारी उपस्थित होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत २८ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. तसेच, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीची खाती तपासून मंजूर करण्यात आली आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करून त्यांचे मानधन निश्चित केले गेले. २०२४-२५ चा वार्षिक अहवालही मंजूर करण्यात आला. ‘चेस इन स्कूल’ अंतर्गत शाळेतील बुद्धिबळ कार्यक्रमाबद्दल विशेष चर्चा झाली. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी ‘चेस इन स्कूल’चे कार्यक्षेत्र वाढवण्यावर भर दिला. प्रत्येक जिल्ह्यात ‘चेस इन स्कूल’साठी सेमिनार आयोजित करून पुढील तीन वर्षांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष वेबसाइट सुरू करण्याची माहिती अतुल जैन यांनी दिली.
महाराष्ट्र आर्बिटर कमिशनने नियुक्त केलेल्या चीफ आणि डेप्युटी आर्बिटरच्या मानधनात वाढ करण्याबाबत आर्बिटर कमिशनचे अध्यक्ष पी. बी. भिलारे यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक नियमांमधील बदल आणि स्पोर्ट्स पॉलिसी व कोड यावरही चर्चा करण्यात आली. सभेच्या समारोपावेळी अशोक जैन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्रात पूर्वी दोन ग्रँडमास्टर होते, आता त्यांची संख्या सुमारे १४ झाली आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यासाठी वातावरण निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या विविध उपक्रमांचे फलित आहे. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये अजूनही आपले कार्य सुरू असून, ते अधिक सक्रियपणे वाढवता येऊ शकते असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण सभेचे योग्यरित्या समन्वय निरंजन गोडबोले यांनी केले.



