मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र हे कर संकलनात आघाडीचे राज्य असल्याने काही जणांना पोटदुखी होत असून बदनामीचे कारस्थान रचले जात आहे. यामुळे आमचा द्वेष करणार्यांनी बदनामी करू नका असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जीएसटी भवनाचे उदघाटन झाल्यानंतर त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.
वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडले. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “एक वातावरण तयार केलं जातय, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केलं, त्याचं नावच महाविकास आघाडी असं ठेवलं आहे. महाविकास हे केवळ आपल्या नावामध्ये नाही तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो आहोत. आजचं भूमीपूजन हे केवळ नारळ फोडण्यासाठी नाही. प्रत्यक्ष काम आजपासून सुरू करत आहोत आणि हे आपल्या कामाचं एक उदाहरण जे सगळ्यांसमोर ठेवतोय. ते पाहिल्यानंतर मग जो आपल्यावरती रुसवा, फुगवा किंवा आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या ते उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही, कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या ते मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून दिलेलं हे चोख उत्तर आहे.” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.
याचबरोबर “सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे, त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.आज भूमिपूजन होत असलेली इमारत २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल. आज भूमिपूजन होत असलेली इमारत इतकी देखणी असावी की लोकांनी ती पाहण्यासाठी यावी, देशातील जीएसटी विभागाच्या इमारतीपैकी ही इमारत सर्वात देखणी इमारत ठरावी.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.