महंत सुनील महाराज शिवसेनेत : संजय राठोडांना घेरण्याची रणनिती !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंजारा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व असणारे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून ते मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आगामी निवडणुकीत उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज मुंबईत बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याआधीही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनीच महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन बांधले. यामुळे आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचे शिवसेनेचे नियोजन असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, पोहरादेवी देवस्थानाला बंजारा समाजात खूप महत्व असून याचेच महंत शिवसेनेत दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे वेधले गेले आहे. याप्रसंगी उध्दव ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण यांना जेव्हा लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेना प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे याचं भवितव्य घडवण्याची. दसर्‍यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवीलाही मी जरूर जाईन, अशी ग्वाही उध्दव ठाकरे यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content