जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराजांनी केली पाहणी

फैजपूर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात दोन दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यातील नुकसानाची माहिती मिळताच फैजपूर येथील सतपंथ् मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी भेट देवून परिसराची पाहणी केली.

मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसाने जामनेर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. पावसाचे हे झोडपणे कमी झाले म्हणून की काय, चक्रीवादळ आले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. ७ सप्टेंबर सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता मात्र अशाच वेळी सुमारे अकरा वाजता पावसातच चक्रीवादळाला सुरुवात झाली. या चक्रीवादळाचा जोर एवढा प्रचंड होता की टाकळी बु!! आणि पिंपळगाव गोलाईत दरम्यान  हायवेला नव्याने काम सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या केनोपी वरील सर्व पत्रे हवेतून लांबवर गेली. त्या पत्रामुळे अनेक झाडांचे शेंडे कापल्यामुळे ती अक्षरशः बोडकी झाली.

या चक्रीवादळाने तालुक्यातील ओझर बु!!, ओझर खुर्द, ओझर हिंगणे या गावात प्रचंड नुकसान केले. शेतातील केळी बाग, कपाशी, हायब्रीड पीक  भुईसपाट झाले. तर  गावातील लोकांच्या घरावरील पत्रे अक्षरशः सर्वत्र विखुरल्या गेली. शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.

जामनेर तालुक्यातील नुकसानाची माहिती मिळताच फैजपूर येथील सतपंथ् मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज अक्षरशः धावून आले.

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा  प्रत्यय यावेळी सुद्धा आला. धार्मिक कार्य करीत असताना सामाजिक कार्य सुद्धा जीव ओतून करणारे जनार्दन हरीजी महाराजांनी सर्व पीडितांचे दुःख जाणून घेतले. पीडितांना धैर्य दिले. ओझर,ओझर हिंगणे येथील घरांची पडझड आणि पीकांचे झालेले नुकसान यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर टाकळी बुद्रुक आणि पिंपळगाव गोलाईत येथे जाऊन शेताची पाहणी केली. महाराजांच्या भेटीने गावातील सर्व नुकसानग्रस्त नागरिकांचे यामुळे मनोधैर्य वाढले.

या प्रसंगी महाराजांच्या समवेत गुरुदेव सेवाआश्रम जामनेर येथील श्री श्याम चैतन्यजी महाराज, उमाकांत पाटील सर फैजपूर, नितिन किरंगे, युवराज किरंगे, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच संदीप भाऊ पाटील, नामदेव चव्हाण, डॉ. विश्वजित सिसोदे, संग्राम सिसोदे, सचीनभाऊ जाधव, जयपाल सिसोदे आदी उपस्थित होते.

 

Protected Content