रावेर प्रतिनिधी । बनावट नोटा प्रकरणी मध्य प्रदेशच्या हरदा पोलिसांनी रावेर शहरातून एका संशयितास आज दुपारी ताब्यात घेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, शंभर रूपयाच्या नकली नोटा चलनात वापरल्याने हरदा (मध्य प्रदेश) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नकली नोटा वापर करणारे आरोपी मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी नकली नोटा रावेर शहरातील (मदीना कॉलनी) येथून २२ वर्षीय युवका कडून घेतल्याचे सांगितले. याला ताब्यात घेण्यासाठी हरदा येथील डीवायएसपी प्रदीप शर्मा आपल्या टीम सह रावेरात येऊन पोलिस स्टेशन गाठले व या आरोपी बद्दल चौकशी केली असता पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर पोलिस सुरेश मेढे, मंदार पाटील व श्री तडवी यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या सोबत जाऊन त्याला आज दुपारी ताब्यात घेऊन मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे. नकली नोटा संदर्भात मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता असल्याने पुढील तपासासाठी आरोपीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.