मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ८० आणि ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही तितक्याच आदराने आणि प्रेमाने पाहिली जाते. जगभरातील चाहत्यांना आश्चर्य वाटत होते की यशाच्या शिखरावर असताना तिने विवाह करून अमेरिका का गाठली आणि दीर्घ काळानंतर तिने भारतात परतण्याचा निर्णय का घेतला? अखेर माधुरीने स्वतःच याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे.

१९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केल्यानंतर माधुरी दीक्षित अमेरिकेत स्थायिक झाली. दोन्ही मुलांचा जन्म तेथेच झाला आणि कुटुंबियांसोबत तिने साधं पण आनंदी आयुष्य घालवलं. तिचे अनेक भाऊ–बहिणी तसेच डॉ. नेने यांचे नातेवाईक अमेरिकेतच राहत असल्याने तेथे तिने दीर्घकाळ वास्तव्य केले. मात्र जवळपास दशकभरानंतर माधुरीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली.

रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माधुरीने सांगितले की तिच्या पालकांचा भारतात परतण्याचा आग्रह हा या निर्णयामागील प्रमुख घटक होता. ती म्हणाली, “माझे आईवडील माझ्या संपूर्ण करिअरमध्ये माझ्यासोबत होते. त्यांच्या उतारवयात त्यांना भारतात परत जायचे होते. मला त्यांना एकटे सोडायचे नव्हते. मनापासून वाटत होतं की त्यांना ज्या ठिकाणी आराम वाटेल तिथेच त्यांनी राहायला हवे.”
माधुरीने पुढे स्पष्ट केले की, तिचे कामही मोठ्या प्रमाणावर भारतातच असल्याने सातत्याने भारत-अमेरिका प्रवास करणे अत्यंत थकवणारे आणि अवघड होत होते. ती म्हणाली, “मी कामासाठी भारतात येत असे आणि पुन्हा अमेरिकेत परत जात असे. हा लांबचा प्रवास शारीरिक आणि मानसिकरीत्या कष्टदायक होता.”
तिने याच वेळी पती डॉ. नेने यांच्या निर्णयाचाही उल्लेख केला. अमेरिकेत येणारे रुग्ण गंभीर अवस्थेत येत असल्याने त्यांना लवकरात लवकर योग्य जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे डॉ. नेने यांना वाटत होते. त्यामुळे भारतात राहून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याची इच्छा त्यांच्याही मनात होती. माधुरी म्हणाली, “रामलाही बदल हवा होता. आम्हा दोघांनाही वाटलं की आता हे पाऊल उचलण्याची योग्य वेळ आली आहे. मला भारताची प्रचंड आठवण यायचीच. म्हणून आम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.”



