अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्मारकाजवळ झोपत जाऊ नको असे सांगण्याचा रागातून तरूणाने भोई समाज मढीच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना मंगळवारी ३० रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशाल दशरथ चौधरी (रा.भोईवाडा) हा भोई समाज पंचमंडळ मढी जवळ असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकावर मंगळवार ३० जुलै रोजी १०.३० वाजेच्या सुमारास झोपला होता. तेथून महिला येत जात असल्याने नागरिकांनी त्याला शॉर्ट पॅन्टवर झोपू नको म्हणून सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने बाजूला असलेल्या दुचाकीचे पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत काढून ते मढीच्या दरवाजाच्या लाकडी पाट्यांवर टाकून पेटवून दिले. दरम्यान ही घटना उघडकीला आल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत ही आग विझविण्यात आली.
दीपक शांताराम भोई याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विशाल चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या पथकाने आरोपी विशाल याला अटक केली असून न्यायालयाने संशयित आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.