जळगाव, प्रतिनिधी | मूळजी जेठा महाविद्यालयाचा इव्हेंट मॅनेजमेंट विभागातर्फे सलग ५ व्या वर्षी पुन्हा “खान्देश गॉट टॅलेंट-२०२० सिजन-५” या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास नामवंत मराठी सिने अभिनेत्री ‘तुला पाहतेरे फेम’ गायत्री दातार यांची प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी के. सी. ई. सोसायटी प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, झाल्टे बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स संचालक अॅड. राजेश झाल्टे, पंकज कासार आदी उपस्थित होते.
“खान्देश गॉट टॅलेंट-२०२० सिजन-५” हा कार्यक्रम रविवार ५ जानेवारी २०२० रोजी मू. जे. महाविद्यालय परिसर येथे सायंकाळी ६ ते १० वाजता घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चाळीसगाव, भुसावळ, जळगाव येथे आॅडीशन घेण्यात येणार आहे. यात चाळीसगाव येथे २७ डिसेंबर रोजी शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय येथे दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत आॅडीशन घेण्यात येणार आहे. २८ डिसेंबर रोजी भुसावळ येथे जामनेर रोडवरील म्युन्सिपल हायस्कूल येथे दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत तर रविवारी २९ डिसेंबर रोजी जळगाव मू. जे. महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅडीशन घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नृत्य, नाटय व संगीत या कलांचा समावेश करण्यात आला असून स्पर्धा ६ ते १३ वर्ष लहान गट, १३ ते पुढीलवर्ष या दोन गटात घेण्यात येणार आहे. यास्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हयातील कलावंतांना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव इव्हेंट मॅनेजमेंट विभाग, झाल्टे बिल्डर्स अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्स जळगांव व पातोन्डेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तरी यास्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.