जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालय परिसरातील एका मेडीकल दुकानाला शार्टसर्कीटमुळे भीषण आग लागली होती. यात औषधांसह इतर इलेक्ट्रॉनीक वस्तू असा साडेबारा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील दांडेकर नगर येथील मिलन आनंद चौधरी (वय ४१) यांचे मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील समर्थ कॉलनीत समर्थ नावाचे मेडीकल आहे. या मेडीकलला रविवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत मेडीकल दुकानातील ८ लाखांच्या औषधी, २ लाखांच्या कॉस्मेटीक सामान, ८० हजार रुपये रोख, ७ हजारांचे फ्रिज, २० हजार रुपयांचे कॉम्प्युटर, १ लाख रुपयांचे फर्निचर, ५ हजार रुपयांचे प्रिन्टर, १० हजार रुपयांचा मोबाईल, ७० रुपयांचा फॅन, २ हजारांचे कुलर, २ हजाराचे लहान फ्रीज व २० हजार रुपयांची ईर्न्व्हटरची बॅटरी असा एकूण १२ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल खाक झाले आहे. मिलन चौधरी यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीसात आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी हे करीत आहेत.