जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील आर.एल. चौफुली येथे उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार ६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित लक्झरी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल छबुलाल पाटील (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अनिल पाटील हे बुधवारी रात्री आठ वाजता सुप्रीम कॉलनीतील आर.एल. चौफुली येथे उभे असताना, एमएच १९ सीवाय ८०६३ क्रमांकाच्या एका लक्झरी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अनिल पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंतर लक्झरी बस चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता. जखमी अनिल पाटील यांची बहीण भारती पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार, लक्झरी बसवरील चालक नंदकिशोर गणेशराव गावंडे (रा. साईनगर, कुसुंबा) याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.



