भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवत भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील शासकीय नोकरदाराची तब्बल ८ लाख १२ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान घडला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव रहिवासी असलेले व सध्या मुंबईत नोकरीला असलेले कर्मचारी सुटी घेऊन गावी आले होते. त्यावेळी त्यांच्याशी तीन जणांनी व्हाटस्ॲपवर संपर्क साधून त्यांना एक लिंक पाठविली व टेलिग्राममध्ये ॲड केले. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे अमिष दाखविण्यात आले. त्यानुसार त्यांनी रक्कम गुंतविली. त्या गुंतवणुकीवर नफा देण्यात येऊन विश्वास संपादन केला. नंतर त्यांनी ८ लाख १२ हजार रुपये अशी मोठी रक्कम गुंतविली. मात्र कोणताही परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या तीन अनोळखींविरुद्ध शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.